गोपालराज कपाटे बाबा

मी महानुभाव पंथीय नसलो तरीही माझ्या घरचे आणि सर्व नातलग महानुभाव पंथीयच आहेत. आमच्यासमोर धर्मभाषा म्हणून लहानपणापासून मराठीच ठेवली गेली. वाचलेल्या पोथ्या मराठीच! अपवादात्मक आरत्या सोडल्या तर सर्व आरत्या मराठीतच. 'गरुडावर बैसोनी झडकरी तुम्ही यावे' माझी सर्वात जास्त आवडती आरती.

महानुभाव पंथीय संत-महंत कधीही पंचतारांकीत सुविधा वापरताना दिसणार नाहीत. एसटी, बस, शेअर ऑटो, जे उपलब्ध असेल त्या वाहनाने प्रवास करणारे, अगदी सर्व सामन्यांच्या घरी जाऊन चटणी भाकरी आनंदाने ग्रहण करणारे, जातीपातीला फाट्यावर मारणारे, महानुभाव पंथीय मठांमध्ये आपण गेलो तर अगदी घरच्या व्यक्तिप्रमाणे वागवणारे, त्याचप्रमाणे कृष्णभक्तीत आणि श्री. चक्रधर स्वामींच्या चरणी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेल्या संताबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतात.

मराठीच्या चळवळीमध्ये अनेक महानुभाव संतांशी नव्याने ओळख झाली. त्यातीलच एक - गोपाल राज कपाटे बाबा. कपाटे बाबांच्या मराठी प्रेमाबद्दल अतिशय आदर वाटतो. कपाटे बाबा ज्ञानभाषा मराठीच्या अनेक भाषिक उपक्रमांत सक्रीय सहभाग नोंदवतात. अभ्यासक्रमात असलेल्या लीळाचरित्रातील लीळांची आम्हाला फोड करून सांगतात, स्वतः त्याचं रसग्रहण लिहितात. त्यांच्याकडून whatsapp वर येणाऱ्या रोजच्या जीवनपर, पौराणिक, धार्मिक संदेशांमध्येदेखील आवर्जून मराठीचाच वापर केलेला असतो. धर्मप्रसारासोबतच मराठीचं संवर्धन किंबहुना तळागाळात धर्माच्या प्रचारासाठी #लोकभाषा मराठीच! तिला पर्याय नाही, हे त्रिकालबाधीत सत्य त्यांना आणि त्यांच्यासारख्या असंख्य महानुभाव संतांना खूप अगोदर समजले आहे...

अशा संतांना शतशः नमन

- सुचिकांत वनारसे

#धर्मभाषामराठी #लोकभाषामराठी


Comments

Popular Posts